यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - नशिबा
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
चल ये तुटून पड, जणू मी मरणार आहे
नशिबा मी तुझ्याशी दोन हात करणार आहे
या इथे माझे देऊळ आहे भंगलेले
अन माझे शस्त्र ही जुनाट पुर्ण गंजलेले
सावलीही कदाचीत साथ सोडणार आहे
चल ये तुटून पड, जणू मी मरणार आहे
नशिबा मी तुझ्याशी दोन हात करणार आहे
जो तो आपल्या गतीने पुढे जात राहीला
पायाशी अजाण पिल्लू त्याला कुणी ना पाहीला
फायदा तोटाच सर्व दुनिया मांडणार आहे
चल ये तुटून पड, जणू मी मरणार आहे
नशिबा मी तुझ्याशी दोन हात करणार आहे
हिशोबी जो तो येथे, बेरकी येथील पात्रे
भ्रांतीत आहेत माझी, उद्विग्न नेक गात्रे
स्वाहा सर्व काही, आता मला गिळणार आहे
चल ये तुटून पड, जणू मी मरणार आहे
नशिबा मी तुझ्याशी दोन हात करणार आहे
संपवते जरी कुणी, कधी काही का संपते
चैतन्य शिंपडुनी सृष्टी, वसंत पुन्हा फुलविते
तारा कोसळणारा, मला सत्व देणार आहे
चल ये तुटून पड, जणू मी मरणार आहे
नशिबा मी तुझ्याशी दोन हात करणार आहे
शोषुनी घेत आहे, उर्जा मी प्रलयातुनी
वाहतो अंगार माझ्या, धमन्याधमन्यातुनी
गांडीवाचा टणत्कार, विश्वात गुंजणार आहे
चल ये तुटून पड, जणू मी मरणार आहे
नशिबा मी तुझ्याशी दोन हात करणार आहे
-बिपीनचंद्र