यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - नवं नवं..
लेखक: धनलक्ष्मी
नवं नवं.. सारं कसं हवं हवच नाही का?
नवा ड्रेस, नवी गाडी जमलच तर नवीन घर तेही नवीन वर्षात! चारहीबाजूंनी उठताबसता डोळ्यांची पापणीपण न लवू देता, कानाचे पडदे फाटतील अश्या आवाजातले आणि अनेकविध रंगातल्या जाहिराती! भुरळ न पडायला आपण काय साधुमहंत आहोत ~))
वस्तू तीच, जाहिरात तीच पण करणारे चेहरे नवे. झालंच तर त्या साबणाच्या वडीवरती New, improved असे छापले की झाली ती नवी :)
"अगं घरात खूप आहेत खेळण्यातल्या कार्स, राहु दे, दुसर्या कुणालातरी भेट दे" एक प्रेमळ माता. "अग्गं मम्मा, त्या सर्व जुन्या झाल्यात आता. आँटी नवीन देतायत ना!". चिरंजीवांची मांडवली. कित्ती झालंतरी नव्याचा हव्यास नाहीच सोडवत.
काय सांगता? तुमच्या दिवसाची सुरुवातपण फेसबूकवर नवीन फोटो टाकूनच होते होय? पाहीलंत :)
"सकाळ झाल्यावर जसं सडारांगोळीने आपापली घरं-अंगणं सजवतात, तसंच सकाळी-सकाळी फेसबूकवर नवीन चकचकीत फोटो लावून प्रोफाईल सजवणे असते आजकाल" - इति. एक फेसबूकमित्र! :P
"माझ्या सासुच्या सासुने पण या पितळी भांड्यात पाहून कुंकू नीट केल असेल बर्का. जरा चिंचेचा कोळ लावून घासली तर मस्त लखलखते भांडं. शिवाय मजबूत. कस्शाला हवंय नापतौलवरचं सॉसपॅन. तुम्ही आजकालच्या मुली ना. जरा कष्टाची सवय नाही तुम्हाला. दोन दिवसात वाट लावेल त्या सॉसपॅनची भांडेवाली.
असेल तुमचं टाईड का कायते. हुषार गृहिणी निर्माच वापरतात बरं". एका नवसासुची मुक्ताफळं!
आता निरमाची मॉडेल आज आज्जीबाई झाली असणार. फ्रीलचा फ्रॉकचा घेर पसरवून 'दुधसी सफेदी'वाला निरमाच वापरा म्हणून सांगणारी गोड पोरं. हेमा, रेखा, जया सुषमा आल्या गेल्या तरी अजून त्या पॅकेटवर विराजमान आहेच.
मग काय करावं? नवं वापरूच नये? की जुनं म्हणून टाकून द्यावं?
स्टीव्ह जॉब्स म्हणायचेत म्हणे, जोपर्यंत आपण आपल्याजवळचं सर्व फेकून देत नाही, तोवर आपण नवीन काही शोध लावू शकणार नाही. किंवा अशाच आशयाचं विधान होतं ते.
खरंय की! रोज त्याच रस्त्याने जायचं किंवा तीच लोकल पकडायची. त्याच नेहमीच्या चारटाळक्यांबरोबर नेहमीचा काथ्याकूट करून झाला की संपला दिवस! अश्याने आयुष्याचं वेष्टण न्यू-इम्प्रूव्हड होणार कसं?
"तुमची काय मज्जा आहे ब्वॉ. रोज नवीन हॉटेलात जाता, नवनवीन ठिकाणी फिरून कायकै गोळा करता. आम्हाला कुठे जमणार हे सगळं." अशी अनुनासिक उद्गार काढत बसू नका :P
जुन्या आणि नव्याची सांगड घाला. जुन्या रस्त्याने जा, पण नवं वारंही अंगावर घ्यायला कचरू नका.
बरं.. १ तारखेला काय कराल? सांगत्ये ना.. सकाळी मस्तपैकी चहा करायचा. देवाजवळ एक छान सुवासिक अगरबत्ती लावा. सौ किंवा आणि आपल्या माणसासोबत एक नवी घडी उलगडा आयुष्याची. .
त्यानंतर काय नवीन केलंत ते कळवायला विसरू नका बर्का.
तर स्वच्छ मराठीत - विश यू वेरी हॅप्पी न्यू इयर!
~ धनलक्ष्मी
DhanaLaxmiWrites@gmail.com