यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - रांगडा मी
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
रांगडा मी, कळले मला न प्रीतीचे उखाणे
तु तरी समजुन घ्यायचे, माझे असे वागणे
गर्क मी माझ्यात जरी, तुच होती अंतरी
ना गुंतलो कुणात मी , तुच सदा उंबरी
का तरी तु सोडले , केसात फुल माळणे
रांगडा मी, कळले मला न प्रीतीचे उखाणे
तु तरी समजुन घ्यायचे, माझे असे वागणे
बघ तरी नभांतरी, प्रकटली स्वर्णप्रभा
चल बघुया सोबतीने, प्रकृतीची दिव्य शोभा
बरे नव्हे अवकाळी, डोळ्यात थेंब दाटणे
रांगडा मी, कळले मला न प्रीतीचे उखाणे
तु तरी समजुन घ्यायचे, माझे असे वागणे
दिवसाच्या बाहुमध्ये विसावली बघ निशा
बहरल्या गंधवेली, उमलल्या दाही दिशा
आता न जमते मला, माझे मला सांभाळणे
रांगडा मी, कळले मला न प्रीतीचे उखाणे
तु तरी समजुन घ्यायचे, माझे असे वागणे
युगानयुगे हे आहे, जीवनचक्र चाललेले
मिलन वा विरह नशिबी, गुढ कोणा उमगले
भाग्याने भेटलो पुन्हा, सोड सारी भांडणे
रांगडा मी, कळले मला न प्रीतीचे उखाणे
तु तरी समजुन घ्यायचे, माझे असे वागणे
-बिपीनचंद्र