यत्र-तत्र लेखमालाः
Index
यत्र-तत्र लेखमाला - मी बोलेन शब्दातून
लेखक:
बिपीनचंद्र नेवे, जळगाव
मी बोलेन शब्दातून.
शब्दातूनच.
माझे शब्द गहाण नाहीत.
उधार-उसनवार नाहीत.
कुणाचे आंदण नाहीत.
कुणाच्या कृपेचे वांछीत नाहीत.
माझे शब्द शरणार्थी नाहीत.
निर्वासित नाहीत.
कुणाचे मोताद नाहीत.
ती पेरतील अग्नीफुले.
कारण त्यांनी झेललीत अग्नीफुले.
ती विझणार नाहीत.
जळणार.
वंचितांच्या छातीतून,
उपेक्षितांच्या मस्तकातून,
निखारा फुलविणार.
रंजलेल्यांच्या-गांजलेल्यांच्या नजरेतून,
अंगार उसळविणार.
ती देतील थकलेल्यांना हात,
हरलेल्यांना धीर,
अन रडवेल्यांना कवटाळतील कुशीत.
ती बरसतील युद्धातून,
जंगलातून, पर्वताच्या माथ्यावरून,
गुहेतून,
कबरीतून,
प्रसंगी-
रेड्याच्या मुखातून.
ती देतील त्या उर्ध्वज्वल शक्तिंचा सांगावा.
माणूस उठून पुन्हा चालू लागेल,
प्रेमाकडे.
करुणेकडे.
-बिपीनचंद्र नेवे